
दापोली (प्रतिनिधी):
दापोली तालुक्यातील मौजे गावरई (बौद्धवाडी) येथे बौद्धजन सेवा संघ (मुंबई) शाखा क्र. ११, गावराई ग्रामीण व मुंबई भावकी आणि प्रबुद्ध महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक १३ मे २०२६ रोजी भव्य संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी हा सोहळा पार पडणार आहे.
दिवसभराचे भरगच्च कार्यक्रम
या महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी ९:०० वाजल्यापासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे:
सकाळी: बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना, ध्वजारोहण आणि लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा.
दुपारी: स्नेहभोजन आणि महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम.
संध्याकाळी: विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि स्वागत समारंभ.
रात्री: समाज प्रबोधनपर ‘कव्वालीचा जंगी सामना’ रंगणार आहे. यामध्ये नंदकुमार पवार व पार्टी (मुंबई) विरुद्ध तेजल जाधव व पार्टी (मुंबई) यांच्यात सामना होईल.
दिग्गजांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे गृह राज्यमंत्री तथा आमदार योगेशदादा कदम उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भगवानजी घाडगे, रत्नागिरी जि. बौद्ध महासंघाचे अध्यक्ष प्रितमजी रुके, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे तपशील:
स्थळ: बौद्धवाडी, मु. गावरई , पो. नाणटे, ता. दापोली. जि. रत्नागिरी ४१५७१२
वेळ: सकाळी ९:०० वाजल्यापासून.
या मंगलमयी सोहळ्याला समस्त आजी-माजी ग्रामीण व मुंबई कार्यकारिणी, सभासद आणि महिला मंडळाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




