
संगमेश्वर | प्रतिनिधी
कोंडगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर साखरपा–देवरुख मार्गावर १४ चाकी ट्रक रस्त्यालगतच्या डोंगराला धडकल्याने भीषण अपघात झाला. ही घटना शनिवार, २५ एप्रिल रोजी दुपारी घडली असून यात चालक जखमी झाला आहे.
अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव हनुमंत विठ्ठल शिंगटे (वय ४६) असे आहे. ते रिकामा ट्रक (UP 35 AT 1292) घेऊन देवरुखहून कोल्हापूरकडे जात असताना कोंडगावजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट डोंगराला धडकला.
🚨 चालक ट्रकमध्ये अडकला
अपघातानंतर चालक ट्रकमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक फौजदार शांताराम पंदेरे आणि हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
🤝 ग्रामस्थ आणि यंत्रणेची मदत
पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे तसेच ग्रामस्थ पारस साखरे, अंकुश सुर्वे, साहिल चव्हाण, मुरलीधर पांचाळ आणि रवी इन्फ्रा कंपनीच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. चालकाला सुरक्षित बाहेर काढून तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
⚠️ पुढील तपास सुरू
या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





