
रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि कोकण नगर चौकीच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहर परिसरातील गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून ८९,०५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
रत्नागिरी शहरात मागील काही दिवसांपासून गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पाळत ठेवली होती. गुरुवारी (दि. ३० एप्रिल २०२६) सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील शिळ मिरजोळे परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या.
आरोपी आणि जप्त मुद्देमाल
पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्वरुपानंद सुभाष कदम (वय ३०, रा. शिळ कदमवाडी, ता. जि. रत्नागिरी) याला रंगेहाथ पकडण्यात आले. तो बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला:
गुळ, नवसागर मिश्रित कुजके रसायन
तयार गावठी हातभट्टी दारू
एकूण किंमत: ८९,०५० रुपये
हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जागीच नष्ट केला आहे. आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी टीम:
विवेक पाटील (पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर)
तानाजी पवार (सहा. पोलीस निरीक्षक)
सागर शिंदे (पोलीस उपनिरीक्षक)
व पोलीस अंमलदार: दिपक साळवी, राजेंद्र सावंत, अमिता पाटील, उमेश पवार, भालचंद्र मयेकर, अमित पालवे आणि निलेश शिंगवे.
अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – ‘विद्या वंदा न्यूज’





