
दापोली, दि. १ मार्च २०२६ : तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व उद्योजक अक्षय फाटक हे कुटुंबियांसह दुबई येथे अडकले असले, तरी ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. कामानिमित्त दुबईला गेलेले अक्षय फाटक यांच्यासोबत त्यांची कन्या श्रिया फाटक तसेच आते शुभदा साठे हेदेखील तेथे उपस्थित आहेत.
दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढलेल्या तणावाचा परिणाम मध्यपूर्वेतील इतर भागांप्रमाणे दुबईमध्येही जाणवत असून, तेथील परिस्थिती काहीशी तणावपूर्ण बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतील अमेरिकन दूतावास परिसरात हल्ल्याची घटना घडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ विमान उड्डाणांवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आले आहेत.
अक्षय फाटक यांच्याशी कुटुंबीयांनी संपर्क साधला असता, आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची पत्नी स्नेहा फाटक या सध्या दापोली येथे असून, कुटुंबीय सुरक्षित असल्याने नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये, असे त्यांनी सांगितले.
या संदर्भात दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी माहिती देताना सांगितले की, संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यात आला असून, पुढील सूचना मिळेपर्यंत तेथील भारतीय नागरिकांना सध्याच्या ठिकाणीच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भारतीय दूतावासाकडून दुबईतील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याच्या व अनावश्यक बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेमुळे जालगाव व दापोली परिसरात काही काळ चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अक्षय फाटक व त्यांचे कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
(विद्या वंदा न्यूज साप्ताहिक)





