दापोली, ता.०७ (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथे कार्यरत असलेल्या आरोग्यसेविका जयश्री अनिल पांढरे यांना मारहाण झाल्याच्या घटनेने दापोलीत खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ दापोली तालुक्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी आज दापोली पोलीस ठाण्यात जमले होते. त्यांनी पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांना निवेदन देऊन मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. अन्यथा काम बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल (ता.६) रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास दापोली न्यायालयासमोरील सतीमाता मंदिराजवळ घडली. संख्या कोळेकर यांच्या थार वाहनाच्या मागील कोपर्याला पांढरे यांच्या दुचाकीचा किरकोळ धक्का लागल्याने त्यावरून वाद निर्माण झाला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी पांढरे दाम्पत्य कोळेकर यांना भेटायला गेले असता वाद वाढून भांडण झाल्याचे सांगितले जात आहे.
यानंतर पांढरे दाम्पत्य तक्रार देण्यासाठी दापोली पोलीस ठाण्याकडे दुचाकीवरून निघाले असताना त्यांच्या मागून संख्या कोळेकर व त्यांचे पती ओमकार कोळेकर बुलेटवरून आले. दापोली न्यायालयासमोरील सतीमाता मंदिराजवळ त्यांनी पांढरे यांच्या दुचाकीला लाथ मारल्याने ते खाली पडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच एका संशयिताने काळ्या रंगाचा चाकू जयश्री पांढरे यांच्या मानेवर लावून गळा कापण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या वेळी अन्य दोन जणांनीही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीनुसार संख्या कोळेकर, ओमकार कोळेकर तसेच अन्य दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) व ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात संख्या कोळेकर यांनीही जयश्री पांढरे, अनिल पांढरे व त्यांच्या भावाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पांढरे कुटुंबीय त्यांच्या जिममध्ये येऊन शिवीगाळ करत होते. त्यानंतर झालेल्या झटापटीत त्यांनी दुचाकी दाबल्यामुळे कोळेकर पती-पत्नी खाली पडले व त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीनुसार अनिल पांढरे, जयश्री पांढरे व अनिल पांढरे यांच्या भावाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचाही पुढील तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.
या घटनेमुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.





