
राज्यात वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता वाढली असून हवामान विभागाने पुढील काही दिवस अधिक उकाडा वाढण्याचा इशारा दिला आहे.मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. होळी सणानंतर उष्णतेचा जोर अधिक वाढू लागल्याने नागरिकांसह शेतकरीही उकाड्याने हैराण झाले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील अंतर्गत भागात पुढील ५ ते ६ दिवसांत कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर कोकण भागात पुढील दोन दिवस तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी त्यानंतर पुन्हा तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या राज्यातील अनेक भागात कोरडे हवामान असून काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषतः उत्तर कोकण आणि किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी असून तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
दरम्यान, तापमान वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्लाही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
दापोली तालुक्यातील गावरई येथे संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्य प्रबोधनात्मक कव्वाली सामन्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबईतील नामांकित कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.





