
वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, इराणवरील हल्ले लवकरच अधिक तीव्र होतील आणि काही तासांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल. पेंटॅगॉनमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, लढाऊ विमानांची संख्या वाढविली जाणार असून मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव होणार आहे.
हेगसेथ यांनी पुढे स्पष्ट केले की, या युद्धापासून रशियाने स्वतःला दूर ठेवावे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेले युद्ध अल्पकालीन ठरू शकते, असा संकेत दिला. मात्र, इराणने आंतरराष्ट्रीय तेलपुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला तर लष्करी कारवाई अधिक तीव्र होईल, असे त्यांनी इशारा दिला.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने अमेरिका आणि इस्रायलसाठी हेरगिरी व सहकार्य केल्याच्या संशयावरून अलीकडील काही दिवसांत ३० जणांना अटक केल्याची माहिती दिली आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि तेलपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





