
दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांची राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली असून, विशेष म्हणजे त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाराष्ट्र शासन च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा शोध घेण्यासाठी ‘आयडॉल शिक्षक’ ही प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत राज्यभरातून ३३२ नामांकने प्राप्त झाली होती. त्यातून अंतिमतः ४२ शिक्षकांची निवड करण्यात आली.
या निवडीत संदेश राऊत यांचे गुणांकन राज्यात अव्वल ठरले असून, प्रथम क्रमांकाने त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यामुळे त्यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
📚 शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श
निवड झालेल्या आयडॉल शिक्षकांचा अनुभव व कौशल्य संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी उपयोगात आणण्याच्या उद्देशाने त्यांना राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षण, कार्यशाळा व चर्चासत्रांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचे दस्तावेजीकरण करून ते अधिकृत संकेतस्थळांवर प्रकाशित करण्यात येणार आहे.
🏫 विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम
टाळसुरे येथील या विद्यालयाने यापूर्वीही महाराष्ट्र शासन च्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला होता. यासाठी ५ लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले होते. तसेच विद्यालयाला ‘अ प्लस’ दर्जाही प्रदान करण्यात आला आहे.
👏 सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
या निवडीबद्दल सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे पदाधिकारी, इंदिरा बेहरे चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य, शालेय समिती तसेच टाळसुरे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांकडून संदेश राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
👉 त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील शिक्षणालाही नवी दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.





