
मुंबई / मंगळुरू: भारताने सुमारे आठ वर्षांनंतर पुन्हा इराणकडून एलपीजी (LPG) खरेदी केली आहे. ‘सी बर्ड’ नावाच्या जहाजाद्वारे हा गॅस आज मंगळुरू बंदरात आगमन करणार आहे.
आखाती देशांतील युद्धामुळे भारताला इंधन पुरवठ्यात मोठा परिणाम भासत होता. स्वयंपाकासाठी एलपीजी आणि पेट्रोल, डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर नागरिकांना रांगा लावाव्या लागत होत्या. या परिस्थितीत, भारताने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या नेतृत्वाखाली ४३ हजार टन एलपीजी इराणकडून खरेदी केली आहे. यात भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचीही भागीदारी आहे.
भारताने याआधी जून २०१८ मध्ये इराणकडून शेवटचा एलपीजी खरेदी केला होता. त्यानंतर अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांमुळे भारताने इराणसोबतचा व्यापार थांबवला होता. मात्र, सध्या आखाती देशांमधून जाणाऱ्या मार्गावर होर्मुझ सामुद्रधुनीमधील अडथळ्यांमुळे एलपीजीच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारताच्या एलपीजी गरजेपैकी सुमारे दोन तृतियांश आयात केली जातात, आणि त्यापैकी ९०% गॅस हा आखाती देशांमधून येतो.
सध्या सुरू असलेल्या संकटात ४३ हजार टन एलपीजी हा भारताच्या दैनंदिन गरजेपैकी सुमारे अर्ध्या दिवसाची गरज भागवू शकतो. विशेष म्हणजे, हा जहाज आधी चीनकडे जाणार होता, परंतु अचानक भारताकडे वळवण्यात आले. भारत आणखी दोन एलपीजीने भरलेली जहाजे आणण्याची तयारी करत असून, अंतिम चर्चा सुरू आहे.
या निर्णयामुळे भारतात गॅसच्या तुटवड्यावरील ताण कमी होईल आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.





