
नाशिक: नाशिक येथील अशोक खरात प्रकरण राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. खरातवर अनेक महिलांवर लैंगिक छळ केल्याचे आरोप आहेत, आणि आतापर्यंत या प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका विद्यार्थीनीवर केलेल्या छळाचा देखील समावेश आहे. खरात अनेक राजकीय नेत्यांशी संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे, तसेच त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी देखील आपले मत मांडले. ममता म्हणाल्या:
“त्याला भ्रम झाला होता की तो अवतार आहे. त्या निर्दोष बायकांना त्याने फसवलं. अशा महिलांच्या पतीने आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे. हे नालायक लोक आहेत. तुम्ही त्या महिलांनाही विचारा, काय माहीत त्यांचाही यात सहभाग असू शकतो. मी त्या महिलांना दोषी मानत नाही, त्या निर्दोष आहेत, त्यांना क्षमा असावी.”
ती पुढे म्हणाली:
“पण त्या साधूकडे ज्योतिषीसाठी गेल्या होत्या की अन्य काही करण्यासाठी? मर्यादा या महिलांना माहीत नव्हती का? तो जर मर्यादा ओलांडत होता तर त्यांनी त्याला एक लाथ मारून यायला हवी होती. त्याला फटके मारून यायचे. त्याला विचारायचं तुम्ही हे काय करताय?”
नाशिक पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, खरात महिलांना पाणी प्यायला देत असे, जाळ्यात ओढत असे, स्वतःला सिद्ध पुरुष सांगून महिलांवर अत्याचार करत होता. त्याच्यावर पाच नरबळी दिल्याचा संशय आहे. तसेच, फार्महाऊसवर गोळीबार करण्यात आलेली रिकामी काडतुसे मिळाल्या आहेत, त्यांचा तपास सुरू आहे.
न्यायालयाने सुनावणीअंती अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.





