गुहागर (प्रतिनिधी : मंगेश जाधव)

गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय.क्यू.ए.सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे सामाजिक व शैक्षणिक कार्य स्पष्ट केले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा आढावा घेत, समाजप्रबोधनासाठी लेखन, विविध कला प्रकार आणि सामाजिक कार्यातून योगदान देण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण सामाजिक ऋणाची परतफेड केली पाहिजे, तरच त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.
या कार्यक्रमास डॉ. प्रवीण सनये, डॉ. प्रसाद भागवत, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, ग्रंथपाल धनंजय गुरव, ग्रंथ परिचर परशुराम चव्हाण तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कांचन कदम यांनी केले.





