
अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानात झालेल्या शांतता चर्चेला अखेर ब्रेक लागला असून महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत न झाल्याने चर्चा निष्फळ ठरली आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चर्चा फिस्कटल्याबाबत इराणने अमेरिकेलाच जबाबदार धरत अमेरिकेच्या मागण्या अवास्तव असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास नकार दिल्यामुळेच चर्चा अपयशी ठरल्याचे स्पष्ट केले.
या चर्चेनंतर व्हान्स कोणतीही पूर्वसूचना न देता थेट वॉशिंग्टनला रवाना झाल्याने या चर्चेच्या अपयशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानने दोन्ही देशांना सध्या लागू असलेल्या १४ दिवसांच्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानच्या या प्रस्तावावर दोन्ही देशांचा काय प्रतिसाद येतो, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.
माध्यमांनुसार, अमेरिकेने इराणकडे युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची आणि सुमारे ९०० पाउंड युरेनियमचा साठा देशाबाहेर हलवण्याची मागणी केली होती. तसेच होर्मुझची सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनावरही नियंत्रण ठेवण्याची अट मांडली होती. या अटींमुळेच चर्चेत अडथळे निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडींचा परिणाम पाकिस्तानच्या प्रतिमेवरही झाल्याचे मानले जात आहे. चर्चेचे नेतृत्व करणारे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सध्या दोन्ही देशांमध्ये तात्पुरता युद्धविराम लागू असला तरी चर्चा अपयशी ठरल्याने भविष्यातील परिस्थिती अनिश्चित बनली आहे. यामुळे जागतिक पातळीवर राजनैतिक हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.






