उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत असून परिस्थिती गंभीर बनली आहे.
तालुक्यातील निवळी, सरंद आणि बेलारी या तीन गावांमध्ये पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या गावांनी प्रशासनाकडे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, मागणी करूनही अद्याप टँकर सेवा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सविस्तर टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे. यंदा तालुक्यातील तब्बल ७२ गावे आणि १७७ वाड्यांना पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने सुमारे १ कोटी ३८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीस उशीर होत असल्याने सध्या प्रभावित गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने आगामी काळात टँकरची मागणी करणाऱ्या गावांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.






