नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले असून एसआयटी पथकाने त्याच्या कार्यालयाची पुन्हा झडती घेत महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात तपास करताना पथकाला विशिष्ट औषधाची बाटली, कुजलेले पेढे, सॅनिटायझरची बाटली तसेच केबिनच्या आतील कडीवरील हाताचे ठसे आढळले. फॉरेन्सिक अहवालानुसार हे ठसे खरात यांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वस्तूंचा वापर करून पीडित महिलांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तपासातून समोर येत आहे. जरी पीडितांचे ठसे या वस्तूंवर आढळले नसले, तरी अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचे काही पूरक पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अशोक खरात याच्यावर शिर्डी, सिन्नर आणि नाशिक या भागांत एकूण १६ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ८ गुन्हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत.
एसआयटीचे अधिकारी अमोल भारती यांच्या उपस्थितीत कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी पुन्हा तपासणी करण्यात आली. या कारवाईत आणखी काही पुरावे जप्त करण्यात आले असून तपास अधिक वेगाने सुरू आहे.
खरातच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि.१३) संपत असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याआधी अधिक पुरावे गोळा करून तपास मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार असून तिचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणेकडून विविध ठिकाणी चौकशी सुरू आहे. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच घरातील कामगार यांच्याकडे चौकशी करूनही ठोस माहिती मिळालेली नसल्याने तिच्या ठिकाणाबाबत गूढ वाढले आहे.






