कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘भविष्यवेध’चे बळ! मुंबईत करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

प्रतिनिधी :- निलेश कोकमकर
मुंबई : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न ‘कुणबी युवा मुंबई’ सलग्न शिक्षण विभाग यांच्या वतीने रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी परळ येथील कुणबी ज्ञातीगृह (वाघे हॉल) येथे ‘भविष्यवेध: करिअर मार्गदर्शन शिबिराचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. समाजातील विद्यार्थ्यांनी डिजिटल आणि स्पर्धेच्या युगात योग्य दिशा निवडून यशाचे शिखर गाठावे, या उद्देशाने आयोजित या शिबिराला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात ठाणे येथील संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक सन्माननीय मंगेश बोरकर सर यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी केवळ पारंपरिक पदवी शिक्षणावर मर्यादित न राहता UPSC, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षा, आधुनिक क्षेत्रांतील करिअर संधी आणि व्होकेशनल कोर्सेस याबाबत सविस्तर माहिती दिली.
“मुलांच्या आवडीनुसार करिअर निवडताना पालकांनी त्यांना दडपण न देता पाठबळ द्यावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी १० वी आणि १२ वी नंतरच करिअरचा विचार न करता त्याची तयारी ५ वी ते ७ वीपासूनच सुरू करावी, असे कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दिपिका आग्रे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुणबी युवा मुंबईचे युवाध्यक्ष श्री. युवराज कांबळे सर यांनी आपल्या मनोगतातून तरुणांना संघटित होऊन प्रगती करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे प्रमुख श्री. निलेश कुळये यांनी केले. प्रास्ताविकात युवासचिव श्री. सचिन रामाणे यांनी शिबिराची भूमिका स्पष्ट करत युवकांनी अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे मत व्यक्त केले.
तर शिक्षण विभागाचे सदस्य श्री. शशांक रांगळे सर आणि प्रचारक निळकंठ शां. तांबे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, पालक, युवा पदाधिकारी, तालुका शाखा व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वी पद्धतीने संपन्न झाला.
‘शिक्षणातून क्रांती आणि करिअरमधून प्रगती’ हा मंत्र घेऊन ‘भविष्यवेध’ शिबिराने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी केली.
📢 अधिक अपडेट्ससाठी ‘विद्या वंदा न्यूज साप्ताहिक’सोबत जोडलेले रहा!





