
दापोली :- आज २५ एप्रिल २०२६ रोजी देशभरात जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात येत आहे. कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती निर्माण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवणे आणि मृत्यूदर कमी करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
हिवतापासारख्या आजारांमुळे पूर्वी मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते. मात्र आरोग्य विभाग, संशोधन व जनजागृतीमुळे या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश मिळाले आहे. मादी अॅनाफिलीस डासाच्या चाव्यामुळे हिवतापाचा प्रसार होतो, हे संशोधन डॉ. रोनाल्ड रॉस यांनी सिद्ध केले असून त्यामुळे रोग नियंत्रणात महत्त्वाची मदत झाली आहे.
यंदाच्या जागतिक हिवताप दिनाचे घोषवाक्य “हिवताप दुरी करण्यासाठी कटिबद्ध, आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे” असे आहे. डासांच्या माध्यमातून पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराच्या आजूबाजूला पाणी साचू न देणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, पाणीसाठ्यांवर झाकण ठेवणे, डास प्रतिबंधक उपायांचा वापर करणे, तसेच मच्छरदाणीचा वापर करणे आवश्यक आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवतापामध्ये थंडी, ताप, घाम, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम हे प्रमुख जंतू हिवतापासाठी कारणीभूत ठरतात. विशेषतः फॅल्सीपेरम प्रकार धोकादायक असून वेळेत उपचार न झाल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
आरोग्य विभागाने नागरिकांना तापाची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे ही काळाची गरज असल्याचेही आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.





