प्रतिनिधी- दापोली

दापोली : दापोली एस.टी. बस प्रवासादरम्यान किरकोळ कारणावरून बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण व धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात चार प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बस चालक साई विवेक कदम (वय २७, रा. काळकाई कोंड, दापोली) हे दि. २२ एप्रिल रोजी पहाटे बोरिवली ते दापोली एस.टी. बस (एमएच ४९ बीई ८९४२) घेऊन प्रवास करत होते. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बस चिंचाळी फाटा येथे आली असताना प्रवासी राहुल ज्ञानेश्वर बिराजदार, गणेश बालाजी बिराजदार, नवाल सोमनाथ कांबळे आणि शुभम बसवराज पाटील (सर्व रा. काटगाव, जिल्हा धाराशिव) यांनी बसमधून उतरताना किरकोळ कारणावरून चालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद वाढत जाऊन संशयित चौघांनी चालक कदम यांना शिवीगाळ करत हाताच्या थापटांनी मारहाण केली तसेच धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर जखमी व घाबरलेल्या चालक साई कदम यांनी थेट दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत चारही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साखरे करत आहेत.





