

गुहागर (प्रतिनिधी : मंगेश जाधव) – गुहागर तालुक्यातील जानवळे मोहल्ला येथे पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी उत्साहपूर्ण आणि सामुदायिक ऐक्याच्या वातावरणात पार पडली. या कार्यक्रमाला नूतन जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री. प्रमोद गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष श्री. विनोद जानवळकर तसेच जानवळे गावच्या उपसरपंच सौ. वैभवी जानवळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात विविध धर्मीय नागरिक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना श्री. प्रमोद गांधी यांनी सर्वधर्मीय एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, समाजात ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर सन्मान वाढीस लागण्यासाठी अशा इफ्तार पार्टीसारख्या कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. राजकारणासह समाजजीवनात सर्वधर्मीय सौहार्द टिकून राहणे अत्यंत आवश्यक असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो, असे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, सरपंच सौ. जान्हवी विखारे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, उपस्थितांनी याचे स्वागत केले.
इफ्तार पार्टीच्या निमित्ताने जानवळे मोहल्ला परिसरात बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर दर्शन घडले. अशा उपक्रमांमुळे समाजातील ऐक्य अधिक दृढ होण्यास मदत होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





