
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी बोगदा परिसरात मारुती स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून कोकणाच्या दिशेने निघालेली मारुती स्विफ्ट कार कशेडी बोगद्याजवळ पोहोचली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भागावर जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला असून इंजिनचेही मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दुसऱ्या जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघाताचे नेमके कारण आणि मृत व जखमी व्यक्तींची ओळख अद्याप समजू शकलेली नसून, अधिक तपास सुरू आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट परिसरात वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.





