
मंडणगड (वार्ताहर) : मंडणगड तालुक्यातील दाभट परिसरातील सहा महिलांनी विश्वासाने जपून ठेवण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या सराईत आरोपी चंद्रकांत तेरवणकर (रा. आंबळे, ता. चिपळूण) याला मंडणगड पोलिसांनी अखेर अटक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला २ लाख ७१ हजार १०० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
मंडणगड पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत सुमारे अडीच हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला. अखेर पुणे येथील ग्रामीण भागात लपून बसलेल्या आरोपीपर्यंत पोहोचून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणी १० मार्च २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात सोन्याचे दागिने लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलिसांची विशेष टीम आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली.
तपासादरम्यान मोबाईल लोकेशन, तांत्रिक माहिती, ट्रेसिंग आणि पोलिसांचे गुप्त माहितीदार यांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू ठेवण्यात आला. पोलिसांनी पुणे, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, धुळे आदी ठिकाणी तीन दिवसांत सखोल शोधमोहीम राबवली. मात्र आरोपी वारंवार सिमकार्ड आणि ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.
अखेर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तपासात आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे उघड झाले असून पूर्वीच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा देखील झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, आरोपी महिलांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. ग्रामीण भागातील महिलांना चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून दाभट येथे सुमारे ३५ महिलांच्या मुलाखती घेतल्याची माहितीही पुढे आली आहे.
तसेच मंडणगड परिसरातील एका लापता युवतीच्या प्रकरणातही आरोपीचा संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तपासादरम्यान त्या युवतीला आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून पुणे येथे बंदिस्त ठेवले होते, असे उघडकीस आले. पोलिसांनी संबंधित युवतीची सुखरूप सुटका करण्यातही यश मिळवले.
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता १८ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुहास मांडवकर, धनंजय सावंत, मोहन देसाई, पोलीस कॉन्स्टेबल वैशाली चव्हाण आणि गुप्त वार्ता विभागाचे विनय पाटील यांनी केली.





