महिलांनी आर्थिक उन्नतीचा धागा पकडून उद्योजक बनावे – पराग कांबळे
दापोली (वार्ताहर) : आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय युगात महिलांनी आपले विचार बदलून आर्थिक उन्नतीचा धागा पकडत नियोजनबद्ध पद्धतीने उद्योजक बनावे. गरजू महिलांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी बळीराज सेना सदैव तयार आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी केले.
दापोली येथील पेन्शनर्स सभागृह येथे आयोजित महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष काशीराम पोसकर होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत पागडे, तालुका महिला आघाडी अध्यक्षा निकिता बाळगुडे तसेच मीनाक्षी शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निकिता बाळगुडे यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर दापोली तालुका बळीराज सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष काशीराम पोसकर यांनी जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या मेळाव्यात महिलांना उद्योग कसा सुरू करावा, आर्थिक नियोजन कसे करावे आणि स्वावलंबी कसे व्हावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनीही आपल्या समस्या व अनुभव मांडत चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी निकिता बाळगुडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. दापोली तालुक्यात महिलांसाठी अशा प्रकारचे आणखी मेळावे आयोजित करावेत, अशी मागणी उपस्थित महिलांनी यावेळी केली. हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार

पडला.





