
देशभरात सध्या एलपीजी तुटवड्याचे संकट तीव्र होत असून त्याचा थेट परिणाम डेअरी उद्योगावर होताना दिसत आहे. विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे दूध उत्पादन आणि वितरण धोक्यात आले आहे.
दूध सुरक्षित ठेवण्यासाठी पाश्चरायझेशन प्रक्रिया अत्यावश्यक असते. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो. याशिवाय दुधाच्या प्लास्टिक पिशव्या आणि कार्टन तयार करण्यासाठीही एलपीजीचा वापर होतो. मात्र सध्याच्या गॅस तुटवड्यामुळे डेअरी कंपन्यांना पॅकेजिंग साहित्य तयार करण्यात अडचणी येत आहेत.
गोवर्धन डेअरीचे संस्थापक देवेंद्र शाह यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीकडे पॅकेजिंग साहित्याचा साठा केवळ १० दिवस पुरेल इतकाच उरला आहे. त्यामुळे परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर दूध पॅकेजिंग आणि वितरण पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संकटाचा सर्वाधिक फटका पॅकेटबंद दुधाला बसत असून, शहरांमध्ये दूध पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक मोठ्या डेअरी कंपन्यांनी इशारा दिला आहे की, पुढील १० दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर बाजारात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते.
भारताची मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयात होर्मुझची सामुद्रधुनी मार्गे होते. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे हा मार्ग बाधित झाला असून, उपलब्ध जहाजांद्वारे होणारा पुरवठा देशाच्या केवळ अल्प गरजा भागवू शकतो. परिणामी औद्योगिक क्षेत्रासह डेअरी उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.





