फेडरेशन कप 2026 साठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघात समरीन बुरोंडकर कर्णधार तर तस्नीम बुरोंडकरचीही निवड
खेड (मुबशिर जमादार)
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने मध्यप्रदेश हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने दि. १९ ते २२ मार्च २०२६ दरम्यान ५ वा फेडरेशन कप वरिष्ठ पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा मध्यप्रदेशातील सतना येथील श्री नरेंद्रदास मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाचे सराव शिबीर दि. ११ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत डोंबिवली (पूर्व), ठाणे येथील सुवर्णा संतोष केणे गार्डन येथे पार पडले. या शिबिरातून महाराष्ट्राचा अंतिम महिला संघ जाहीर करण्यात आला असून अनिकेत स्पोर्ट्स क्लबच्या आघाडीच्या खेळाडू समरीन बुरोंडकर आणि तस्नीम बुरोंडकर यांची संघात निवड झाली आहे.
यामध्ये विशेष बाब म्हणजे समरीन बुरोंडकर हिची महाराष्ट्र महिला कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तिच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल समरीन बुरोंडकर, तस्नीम बुरोंडकर तसेच अनिकेत स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी व प्रशिक्षक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष नाम. श्री. उदय सामंत, उपाध्यक्ष व खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. सतीश चिकणे, तसेच खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष महेश भोसले, उपाध्यक्ष भाई हंबीर, सुभाष आंबेडे, सचिव रविंद्र बैकर, सहसचिव शरद भोसले, खजिनदार दाजी राजगुरू यांसह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या या प्रतिभावान खेळाडूंकडून फेडरेशन कप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी होईल, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

फेडरेशन कप 2026 साठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघात समरीन बुरोंडकर कर्णधार तर तस्नीम बुरोंडकरचीही निवड



