
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाला तब्बल २० दिवस पूर्ण झाले असून, आता या संघर्षाने अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला लष्करी तळ आणि राजकीय नेत्यांपुरते मर्यादित असलेले हल्ले आता थेट ऊर्जा स्रोतांवर—ऑइल आणि गॅस प्रकल्पांवर—केंद्रित होत आहेत. त्यामुळे हा संघर्ष केवळ लष्करी न राहता आर्थिक युद्धात परिवर्तित होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सुरुवातीला इराण मधील सत्ताकेंद्रे, लष्करी तळ आणि राजकीय नेतृत्वांवर लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर संघर्ष समुद्रमार्गे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात पोहोचला, जिथे जहाजांवर हल्ले झाले. आता युद्धाचा फोकस थेट ऊर्जा पायाभूत सुविधांवर गेला आहे.
महत्त्वाच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले
खर्ग द्वीप (इराण) : अमेरिकेकडून हल्ला; इराणच्या सुमारे ९०% कच्च्या तेलाची निर्यात या बेटावरून होते.
साउथ पार्स गॅस फील्ड (इराण) : इस्रायलचा हल्ला; जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक. हल्ल्यानंतर मोठी आग लागल्याची माहिती.
रास लाफान (कतार) : इराणकडून प्रत्युत्तर हल्ला; LNG पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता.
रुवैस रिफायनरी (अबू धाबी) : ड्रोन हल्ल्यामुळे नुकसान; कामकाज तात्पुरते बंद.
रास तनुरा रिफायनरी (सौदी अरेबिया) : उत्पादन क्षमता ५.५ लाख बॅरल प्रतिदिन; हल्ल्यानंतर कामकाज थांबवले.
आर्थिक युद्धाची सुरुवात
ऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले पाहता या युद्धाचे स्वरूप बदलले आहे. तेल आणि गॅस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वाढली असून, जागतिक पुरवठा साखळीवर मोठा ताण निर्माण होऊ शकतो. इंधन दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुज हा महत्त्वाचा समुद्री मार्ग असुरक्षित झाल्यास जगभरातील ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मध्यपूर्वेतील हा संघर्ष आता केवळ प्रादेशिक न राहता जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.





