नवी दिल्ली: पश्चिम आशियातील अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता जवळपास एक महिना पूर्ण होत असून, त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर दिसून येत आहे. विशेषतः इंधन टंचाईच्या शक्यतेमुळे देशभरात चिंता वाढली आहे.
गॅस, पेट्रोल आणि डिझेल संपणार असल्याच्या अफवांमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. ही बैठक सायंकाळी सुमारे ६.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे.
बैठकीत काय होणार चर्चा?
या बैठकीत सध्याच्या संकटाच्या काळात राज्य सरकारांनी केलेली तयारी, इंधन साठवण आणि वितरण याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. तसेच केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यावर भर दिला जाणार आहे.
आचारसंहितेमुळे बदल
ज्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि आचारसंहिता लागू आहे, त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीत सहभागी करून घेतले जाणार नाही. त्याऐवजी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.
साठेबाजांवर कारवाईचे निर्देश
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच संसदेत इंधन पुरवठ्याबाबत माहिती देताना ‘मेड इन इंडिया’ जहाजे आणि साठवण योजना यावर भर दिला होता. तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत.
या बैठकीतून देशातील इंधन परिस्थितीवर मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





