
संगमेश्वर: तालुक्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र धुमाकूळ घातला. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासाही मिळाला.
मागील काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. बाहेर पडताना उन्हाचे चटके बसत असल्याने उकाड्याचा त्रास वाढला होता.
सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही वेळातच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून वाहनचालक व नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.
देवरूखसह आंगवली पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये या पावसाचा जोर पाहायला मिळाला. काही काळ सुरू असलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
मात्र या अवकाळी पावसामुळे काजू आणि आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





