L

रत्नागिरी: तालुक्यातील उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक शांताराम गोणबरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गोणबरे हे काही दिवसांपूर्वी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा शोध घेतला असता ते मिळून न आल्याने त्यांच्या पत्नी दिक्षा गोणबरे यांनी २२ मार्च २०२६ रोजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता नोंद क्रमांक १२/२०२६ अंतर्गत नोंद केली होती.
दरम्यान, उक्षी गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. नदीपात्रात होडीच्या सहाय्याने तसेच जंगल आणि डोंगराळ भागातही शोध घेण्यात आला होता.
शोध सुरू असतानाच २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी करबुडे येथील बावनदीच्या पवार कोंड परिसरात नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. तपासानंतर हा मृतदेह दीपक गोणबरे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मंगळवारी रात्री या प्रकरणाची नोंद बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेत वैद्यकीय प्रक्रियेसाठी जिल्हा आरोग्य विभागानेही सहकार्य केले. दीपक गोणबरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई-वडील, भाऊ व इतर नातेवाईक असा परिवार आहे.





