

खेड: तालुक्यातील निळीक येथे शेतीसाठी भाजावळ करत असताना एका वृद्धाचा आगीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २२ मार्च रोजी घडली. बशीर महामूद चौगुले (वय ६५, रा. निळीक मोहल्ला, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौगुले हे शेतीकामासाठी तसेच भाजावळ करण्यासाठी निळीक गावातील खलाटी परिसरात गेले होते. दुपारच्या सुमारास तीव्र उष्णतेमुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते भाजावळीच्या आगीत पडले.
या घटनेत त्यांच्या अंगावरील कपड्यांना आग लागल्याने ते गंभीररीत्या भाजले. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी खेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.





