दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी सुमारे १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गव्हे पवारवाडी येथील रहिवासी अशोक गोविंद पवार (वय ५१) हे आपल्या कुटुंबासह गावातील भैरी देवीच्या यात्रेसाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी १० एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या सुमारास घरफोडी केली.
चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या सिमेंटच्या दरवाजाला कोयता, पक्कड व चाकूच्या साहाय्याने छिद्र पाडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून त्यातील ऐवज लंपास केला.
या चोरीमध्ये १ लाख ५० हजार रुपयांची रोकड तसेच सुमारे ११ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. यामध्ये पाच विविध प्रकारचे गंठण, हार आणि चपली हार यांचा समावेश आहे. अशाप्रकारे एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी फिर्यादीने आपल्या शेजाऱ्यावर संशय व्यक्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची नोंद दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






