
दापोली (प्रतिनिधी):
दापोली दाभोळ मार्गावरील वळणे परिसरात दापोली पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 2 लाख 40 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला असून, सुमारे 5 लाख रुपये किमतीचे वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
दापोली-दाभोळ मार्गावर गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दापोली पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. दरम्यान वळणे परिसरातील एका हॉटेलसमोर उभी असलेली संशयित कार क्रमांक MH 08 BE 8019 पोलिसांच्या निदर्शनास आली.
तपासणीत मोठा साठा उघड
पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा व पान मसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला. यात प्रत्येकी सुमारे 9,600 पाकिटे गुटखा व पान मसाला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल व कार ताब्यात घेतली आहे.
आरोपी ताब्यात
या प्रकरणी कारचालक आनंद पुजारी (वय 36, रा. खेण्ड, चिपळूण) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांची प्रभावी कारवाई
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, हेमराज निर्मळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, हेड कॉन्स्टेबल राजू मोहिते व स्वप्नील शिवलकर यांनी सहभाग घेतला.
प्रशासनाकडून पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करत असून, गुटखा तस्करीच्या नेटवर्कचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे.





