
मुंबई (प्रतिनिधी):
रविवारचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत उकाड्याचा ठरला. राज्यातील अनेक शहरांमध्ये सरासरीपेक्षा खूपच जास्त तापमानाची नोंद झाली असून, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अहवालानुसार अकोला येथे तब्बल ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे अकोला हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे.
त्यापाठोपाठ अमरावती (४६.८ अंश), वर्धा (४६.४ अंश), यवतमाळ (४६ अंश) आणि नागपूर (४५.४ अंश) या शहरांचा क्रमांक लागला आहे.
विदर्भात उष्णतेचा कहर
रविवारी देशातील १६ सर्वात उष्ण शहरांपैकी सहा शहरं महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील होती. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही तापमान वाढले
विदर्भाबाहेरील भागातही तापमान वाढले असून पुणे, सोलापूर आणि नाशिक येथे पारा ४० अंशांच्या वर गेला आहे.
सोलापूर: ४३° / किमान २६.७°
सातारा: ४१.४°
सांगली: ४१.४°
कोल्हापूर: ३७.६° / किमान २५.३°
पुणे: ४१.८°
नाशिक: ४१.५°
बीड: ४१.९°
अहिल्यानगर: ४१.२°
थंड हवेची ठिकाणंही तापली
महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणंही या उष्णतेच्या लाटेतून सुटलेली नाहीत.
महाबळेश्वर येथे किमान तापमानात वाढ होऊन ते २३.४ अंश वर पोहोचले, तर कमाल तापमान ३३.७ अंश नोंदवले गेले.
माथेरान येथे कमाल तापमान ३७.२ अंश इतके नोंदवण्यात आले आहे.
पुणे परिसरातील लोहगाव येथे रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्णतेपासून संरक्षण घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





