
📍 रत्नागिरी (प्रतिनिधी):
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) मधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून गेल्या सहा महिन्यांपासून पेन्शन वितरणात मोठी अनियमितता सुरू आहे. एप्रिल महिना संपत आला तरी मार्च महिन्याचे पेन्शन अद्याप मिळालेले नसल्याने राज्यभरातील सुमारे १३ हजार पेन्शनधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १८५ निवृत्तांचा समावेश आहे.
🧾 सविस्तर बातमी:
पेन्शन वेळेवर न मिळाल्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजांवर गंभीर परिणाम झाला असून अनेक व्याधीग्रस्तांचे उपचारही रखडले आहेत. २३ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे.
मात्र प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यांपासून पेन्शन वेळेवर मिळत नसल्याने ‘शासकीय आश्वासने केवळ कागदावरच’ असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे, कार्यरत कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत असताना केवळ निवृत्तांना वंचित ठेवले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजाराम विठाळकर यांनी ‘हा दुजाभाव का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
⚠️ कारण आणि आरोप:
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा विभाग आणि वित्त विभाग यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. निवृत्तिवेतन लेखाशीर्षाला मुदतवाढ न मिळाल्यामुळे ही तांत्रिक अडचण उद्भवली असल्याचे समजते.
📨 निवेदन सादर:
या संदर्भात रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष सतीश सोहोनी यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी Manuj Jindal यांना निवेदन सादर केले आहे.
📢 मागणी:
जोपर्यंत शासनाचा निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या राखीव निधीतून पेन्शन अदा करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.





