
📍 रत्नागिरी (प्रतिनिधी):
सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीतून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका इंजिनिअरची तब्बल २६ लाख ७६ हजार ९४१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🧾 सविस्तर बातमी:
फिर्यादी बिनय कुमार सिन्हा (वय ४८, मूळ रा. गुडगाव, हरयाणा; सध्या रा. खंडाळा, जयगड, ता. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार २३ मार्च २०२६ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान घडला आहे.
या प्रकरणी आदिती शर्मा व अंकित शर्मा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिनय सिन्हा हे नाशिक येथील बिल्टकॉन लिमिटेड कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असून सध्या जयगड परिसरातील प्रोजेक्टवर काम करत आहेत.
आरोपींनी सिन्हा यांना क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. यासाठी त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म लिंक देऊन Binance अॅपवर खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर अंकित शर्मा याने स्वतःला ‘सीनिअर फॉरेन एक्स्चेंज ट्रेडिंग कन्सल्टंट’ असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.
या दोघांच्या सांगण्यावरून सिन्हा यांनी टप्प्याटप्प्याने एकूण २६ लाख ७६ हजार ९४१ रुपये गुंतवले. मात्र, मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता ते मिळाले नाहीत. त्यानंतर आरोपींनी संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
⚠️ गुन्हा दाखल:
या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८, ३१९ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
📌 फसवणुकीची पद्धत:
आदिती शर्मा नावाच्या महिलेने सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढवली. सतत मेसेजिंगद्वारे विश्वास संपादन करून तिने क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष दाखवले आणि त्यातून मोठी रक्कम उकळली.





