
संगमेश्वर : लांजा येथील कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाला सोन्याचे दागिने विकण्याच्या बहाण्याने बनावट दागिने देऊन सुमारे साडेतीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २८ एप्रिल) सकाळी संगमेश्वर बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिलेश प्रकाश गुजर (वय ३३, रा. बेनी खुर्द-गुजरवाडी, ता. लांजा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, २० एप्रिल रोजी ते लांजा येथील ‘यंग लूक’ कपड्याच्या दुकानात काम करत असताना दोन अज्ञात व्यक्ती दुकानात आले. त्यांनी आपल्याकडे सोने विक्रीस असल्याचे सांगितले आणि सुमारे साडेतीन लाख रुपयांचा व्यवहार ठरवला.
ठरल्याप्रमाणे २८ एप्रिल रोजी सकाळी संगमेश्वर बसस्थानक परिसरात व्यवहार करण्याचे ठरले. त्यानुसार दिलेश गुजर तेथे पोहोचले असता, संबंधित दोन व्यक्तींनी “जोंधळी मणी सोन्याच्या तारेत गुंफलेला हार” दाखवत ते खरे सोने असल्याचे भासवले. मात्र, नंतर हे दागिने बनावट असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले.
या घटनेनंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई पुढील तपास करत आहेत.





