
रत्नागिरी (वार्ताहर): जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती मनुज जिंदाल यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गॅस एजन्सींमध्ये विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी जिंदाल यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २७ गॅस एजन्सी कार्यरत असून सर्व एजन्सींशी तसेच पुरवठा विभाग आणि गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व भागात गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी एजन्सींमध्ये गर्दी करण्याऐवजी ऑनलाईन बुकिंग सुविधेचा वापर करावा. अनावश्यक गर्दीमुळे संभ्रम आणि अफवा पसरू शकतात, त्यामुळे नागरिकांनी संयम राखून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी जिंदाल यांनी म्हटले आहे.
जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





